महाराष्ट्राचं राजकारण रविवारच्या एका क्षणात पुन्हा चर्चेत आलं, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल १३ वर्षांनी मातोश्रीवर पोहोचले – तेही थेट उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी!
राज आणि उद्धव यांनी काही आठवड्यांपूर्वी एकत्रितपणे ‘आवाज मराठीचा’ या भव्य रॅलीत एकाच मंचावर उभं राहत मिठी मारली होती. आता, ५ जुलैच्या त्या ऐतिहासिक रॅलीनंतर, दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक दिसली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ट्विटरवर एक फोटो शेअर करत लिहिलं, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.”
हि खास भेट २०१२ नंतर पहिल्यांदाच घडली. तेव्हाही राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते – बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी. त्यामुळे हि भेट राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर खूप महत्त्वाची मानली जाते.
“आवाज मराठिचा”ने आणली जवळीक
मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या ‘आवाज मराठिचा’ रॅलीत दोघांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. सरकारने तो निर्णय मागे घेतल्यानंतर मंचावर राज ठाकरे-उद्धव ठाकरेनी मिठी मारत एकजुटीचा संदेश दिला होता.
त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं, “आता आम्ही एकत्र आलो आहोत, आणि एकत्रच राहणार आहोत.”
राजकीय शुभेच्छांचा वर्षाव
उद्धव ठाकरेंच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त INDIA आघाडीतील अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलं, “शिवसेना प्रमुख आणि INDIA आघाडीतील साथीदार उद्धव ठाकरेजींना मन:पूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपलं आरोग्य चांगलं राहो, दीर्घायुष्य लाभो आणि आपण महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी एकत्र लढत राहू.”
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनीही शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरेंच्या भाषिक अस्मितेवरील भूमिकेचं कौतुक केलं.
२०१२ ची आठवण
२०१२ मध्ये उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी राज ठाकरे अलीबागमधून तातडीने मुंबईत आले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी उद्धव यांना घरी नेलं आणि मातोश्रीत प्रवेश केला – कुटुंबात तणाव निर्माण झाल्यानंतर तो त्यांचा पहिलाच दौरा होता.
त्यावेळी उद्धव यांच्या पत्नी रश्मी, राज यांची पत्नी शर्मिला, आणि त्यांची आई कुंदा – ज्या उद्धव यांची मावशीही आहेत – सगळे उपस्थित होते. त्या क्षणाने राजकीय अंतर काही काळासाठी तरी मिटवलं.
कधी तुटलं, कधी जुळलं…
राज ठाकरे यांनी २००५ मध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्षातील वाढता प्रभाव पाहून मातोश्री सोडलं आणि नंतर मनसेची स्थापना केली. तीन महिन्यांतच त्यांनी शिवाजी पार्कवर पहिलं भाषण दिलं – ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी १९६६ मध्ये शिवसेना सुरू केली होती.
आता, हे दोघं पुन्हा एकत्र दिसत आहेत – आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर आहे!